Friday, February 10, 2012

तिचा वाढदिवस.

तिचे वाढदिवस अजूनही स्मरतात
शुभेच्छांचे संदेश ओठावर थांबतात 
कधी एका गुलाबाने डोळे तिचे बोलले होते
आज त्या सुगंधाने मन माझे विव्हळले होते 
आजही तिचा  वाढदिवस आला
डोळ्यांच्या कडा पाणावून गेला 
अशाच एका वाढदिवशी,
तिनेच,मला भेट दिली होती 
ज्यातून जीवनाची खरी ओळख
माझी मलाच झाली होती 
वैशाख वणवा असून
ती दुपार शहारली होती.
आता ती नाही माझी
परक्याचे धन आहे 
कधीच ओथंबून वाहणार नाही
असा एक आषाढ घन आहे.
भेट तिची स्मरता आठवतो,उन पावसाचा लपंडाव अन  
धुक्याची झालर सारून,श्रावण सर घेते अंतरीचा ठाव 
ती नाही माझी मन मनाला बजावते
आठवणींच्या कट्ट्यावर क्षणभर विसावते 
विसरण्याचा अट्टाहास पण किती विचित्र आहे
आता तिचा वाढदिवस गतस्मृतींचे चित्र आहे 
आठवणींचे कोंदण मी आज कोरतो आहे
आणि मी माझी  खरी ओळख पण विसरतो  आहे 

No comments:

Post a Comment