Sunday, February 19, 2012

कविता माझीच.

लिहीन म्हटले,माझ्यावरती मीच कविता 
शब्द नाचले पुढ्यात माझ्या,अर्थहीन मी दमलो पुरता 

बोलू भोगावर कि उपभोगावर,सांगू सत्य कि मांडू वंचना 
कसे सोडवू कोडे माझे,हीच मज पडली विवंचना 

जखमेवरची हालली खपली,घाव बसता मम वर्मावर 
दिसला नाही ओघळ कोणा,काय लिहू मी मम कर्मावर 

नव्हते मजला कधी धिक्कारले , पण नव्हते तसे कधी अव्हेरले 
मूक संवादाचे अर्थ तिच्या त्या, नाही का मज तेंव्हाच गवसले 

आजही स्मरते,तिच्या सहवासातील प्रत्येक क्षण होता आश्वासक 
नाही उमगले मर्म मज त्यातील,आज म्हणून मी आक्रंदतो नाहक 

लिहीन म्हणतो कविता माझी, दखल घेण्या मम सत्वाची 
ठणकता व्रण मम जखमेचा, राही मूर्त उभी तिज अस्तीवाची 

1 comment: