Tuesday, February 28, 2012

समाजसेवा आता तो मनापासून करणार होता

पडता सावली त्याची, देह त्याचा थरारला होता
पारा त्याच्या संतापाचा, त्यास मात्र अनभिज्ञ होता
म्हणे चित्त शुद्धी साठी तो आज, चालला मंदिरी सोवळ्यात होता
कळशी भर पाण्यासाठी,माउली तुडवीत होती काहिली
काठोकाठ विहीर त्याची, पाण्याने होती पुरती वाहिली
म्हणे चित्त शुद्धी साठी तो आज, उपवास निर्जळी करणार होता
सांगण्या एकात्मता त्याने, मांडीला हरिपाठ आज पारावरी
चित्त शुद्धी साठी तो सकाळी न्हायला, वरच्या पाणवठ्यावरी
मानवता हाच एक धर्म, असे आज तो वदणार होता
नको मनी दुजा भाव,अंतरीची विसरा अढी
मंत्र साक्षरतेचा देत वदला, शिकवा पुढची पिढी
शाळेतून मुलीचे नाव,तो आज काढणार होता
वाचाल तर वाचाल सांगत, घेतला प्रौढ साक्षरता वर्ग त्याने
संपताना वर्ग आठवणीने, घेतला अंगठा अर्जावरी हिकमतीने
इतर हक्कातील नाव त्याचे, तो उद्या काढणार होता
सोडूनी पूजा पाठ आता,मनापासून करावी समाजसेवा
लोक कल्याणातुनी कल्याण,साधण्याचा हेतू अंतरी हवा
त्यासाठी मतांचा जोगवा,मागत तो दारोदार फिरणार होता
सभ्यतेच्या बुरख्याआड आज तो दडणार होता
मतदारास आता 'मायबाप'तो वदणार होता
समाजसेवा आता तो मनापासून करणार होता
अन निवडीनंतर समाजाचे पांग तो फेडणार होता.

1 comment: