Sunday, October 3, 2010

नाव गाव कशाला पुसता ?...

शेक्सपियरने म्हटलेच आहे नावात काय आहे ? हे वाक्य आपण बरेचदा ऐकले आहे . पण मला मात्र या पाठोपाठ आठवतो तो चिं.वि.जोशी यांचा याबाबतचा निखळ विनोद. एका ठिकाणी ते म्हणतात-"समर्थ रामदास कि कोणी म्हटलेच आहे कि .. आणि हो आणि कुणी म्हणायला कशाला पाहिजे खरे ते खरेच!"

यावरून आठवले कि नाव आणि गाव हे सर्वाधिक जिव्हाळ्याचे विषय ठरतात. त्यामुळे त्यावर झालेली विविध गाणी काय किंवा अगदी सवाल जवाब, लावणी प्रकारातील गाणी काय ? जसे सुलोचना चव्हाण याची प्रसिद्ध लावणी –

नाव गाव कशाला पुसता, अहो आहे मी कोल्हापूरची

मला हो म्हणतात लवंगी मिरची ..... हि लावणी काय किंवा

नाव सांग सांग नाव सांग या सारखी गाणी म्हणजे, शेक्सपियर काहीही म्हटलेले असो, नाव आणि गाव याबाबत एकूणच प्रत्येकजण सजग असतो. मनाचा एक कोपरा जन्मभूमीशी असा निगडीत असतो कि, मन जरी म्हणत असले कि -पोटासाठी भटकत दूरदेशी फिरेन, राजाच्या सदनी अथवा घोर रांनी शिरेन तरी घरापासून दूर गेले कि आपल्या परिसरातील कोणी तरी भेटावे हि आस वाढीस लागते. भेटणारा नवा माणूस आपल्या परिचित ठिकाणचा निघाला कि ओढ आपोआपच वाटते. तर या नाव आणि गाव यातील गाव म्हटले कि मनात येवून जाणाऱ्या विचारांची मालिका मी आपणा समोर मांडत आहे.

माझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तसे ग्रामीण भागातच आणि तेही नातेवाईकांच्या कडे राहून झाले. कॉलेज सकाळी ७.१५ ते १२.३० या वेळेत असे. तालुक्याचे गाव व सुमारे ३५ वर्षापूर्वीचा काळ त्यामुळे अभ्यासाशिवायचा वेळ कसा मार्गी लावावा हाही प्रश्न बरेचदा पडे. शिवाय तेंव्हा थोडी व आता खूपच वाटणारी एक खंत म्हणजे गायन, चित्रकला किंवा स्वतः मध्ये गुंतून राहता येईल असा छंद कधीच जोपासता आला नाही. आणि आता त्यावर विचार करणे म्हणजे जे राहून गेले ते .... या सदरात मोडणारे.त्याकाळी करमणुकीचे प्रमुख साधन म्हणजे रेडीओ.आकाशवाणी व रेडीओ सिलोन यावरील अनेक कार्यक्रम खरोखरच कान देवून ऐकल्याचे आजही आठवते. काही काळ रेडीओ सिलोन वरील पत्रमैत्री पण जोपासली होती.त्यावेळी भारतातील अनेक गावांची नावे माहित झाली काही ठिकाणी मैत्रीचे धागे जुळले गेले पण का कोण जाणे  पण वीण घट्ट झालीच नाही. अनेक गावांची वर्णने ऐकली. पण त्यातून काही गावे त्यांची नावे व मनचक्षु समोर येणारे चित्र यांची उगीचच सांगड घालण्याचा मनास छंद लागला.

आजही चिकमंगळूर म्हटले कि जनता पक्षाची पीछेहाट व इंदिराजींचे जोरदार पुनरागमन इतकेच आठवते. निवडणुका म्हटले कि दूरदर्शनवरील विनोद दुवा यांचे परीक्षण व त्यात यशवंतराव चव्हाण म्हटले कि सातारा आणि बाबू जगजीवनराम म्हटले कि सासाराम यांची आठवण जातच नाही.

काही गावांचे बाबत त्यांचे आजचे रूप पाहिलेले नाही किंवा ते पाहण्याचा योग कधी येईल माहित नाही, पण नालंदा म्हटले कि उच्च विद्याविभूषित गुरुजन आणि त्यांचे शिष्यगण यांनी भारलेले वातावरण, किंवा कुरुक्षेत्र म्हटले कि लष्करी छावणी असे मन चित्र साकारते.

मला तर नेहमी वाटते कि आडनाव आणि गाव याबाबत बाराखडीतील काही अक्षरे यांचा समूह घ्या, एखाद्या अक्षरास काना आणि अथवा मात्रा किंवा उकार द्या, कि झाले आडनाव अथवा गावाचे नाव. पण अशी गावे स्वतःचा कोणताच चेहरा तयार करीत नाहीत. तर काही गावांच्या नावातच एखादा सूर ताल असल्याचा भास होतो. झुमरीतलैया , नैनिताल किंवा विदिशा, मधुबनी हि नावे गावातील जनजीवन खूपच सुखद असल्याचा भास निर्माण करतात.

काही गावांबाबत तिथे जन्मलेले किंवा त्या परिसरात वाढलेले कर्तुत्ववान लोक त्या गावची प्रतिमा अशी तयार करतात कि जणू ते गावच भाग्यशाली ठरते.माझ्या मनात हा गावांची नावे व त्यातील सूर ताल यांचा खेळ सुरु असताना एकदा एका पाठोपाठ एक अशी तीन नावे डोळ्यासमोरून गेली. त्याच्या नावात साधर्म्य होतेच पण त्याच बरोबर बरेच काही होते काय काय सांगू त्याविषयी असे झाले ती गावे म्हणजे ... मालगुडी, मालगुंड, आणि माडगूळ.
त्यापैकी मालगुडी म्हटले कि आर के नारायणन यांची १९८५/८६ सालातील दूरदर्शनवरील मालिका "मालगुडी डेज" व तिचे श्रवणीय संगीत आठवते. त्याच बरोबर शंकर नाग यांचे कलात्मक दिग्दर्शन आठवून दूरदर्शन चा सुवर्णकाळ आजही डोळ्यासमोर साकारतो. या मालिकेचे चित्रीकरण कर्नाटक राज्यातील अगुंबे या शिमोगा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात झाले होते. आर के नारायण यांच्या गोष्टीत उल्लेखण्यात आलेले हे ठिकाण प्रत्यक्षात अस्तिवात आहे कि नाही या बाबत प्रवाद आहे, पण काही लोकांच्या मते ते कोईमतूर हे एका बाजूस नदी व दुसऱ्या बाजूस अरण्य असणारे ठिकाण आहे. काही लोकांच्या मते लालगुडी हे कावेरी नदीतीरावरील ठिकाण म्हणजे मालगुडी होय. काही लोकांच्या मते यादवगिरी नावाचे म्हैसूर जवळील ठिकाण म्हणजे मालगुडी आहे. प्रत्यक्षात काहीही असो, सदर मालिका व त्यातील पात्रे इतकी जिवंत होती कि दक्षिण भारतीय संस्कृतीचे ते अचूक असे जिवंत चित्रण होते.आणि त्यामुळेच मालगुडी डेज ते श्रवणीय संगीत आज पंचवीस वर्षानंतर देखील तोच थरार मनात निर्माण करू शकते.

मालगुडी पाठोपाठ माझ्या मनाने मालगुंड कधी गाठले ते कळलेच नाही. पण मी मालगुंडला काही रत्नागिरी-गणपतीपुळे या मार्गे नाही गेलो बरका, तर आधी गेलो शाळेच्या दिवसात, मग उलगडली मराठीच्या पुस्तकाची पाने आणि पोहचलो त्या कवितेपाशी. शब्द होते...

एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन जी मी स्वप्राणाने ....
खरोखर मराठी कवितेच्या एका युगावर छाप पडणारा कवी. श्री कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत. कसे असेल त्यांचे गाव आज देखील त्यांच्या त्या कोकणातील गावात जन्मणारे युवक तितकेच पेटून उठणारे असतील का?
का अजूनही त्या तुतारीचा शोधच आपण घेतो आहोत? का कोणत्याच राज्यकर्त्याचे कान यापुढे तुतारीचे स्वर एकुच शकणार नाहीत? अशा प्रश्नांची मालिकाच उभी राहिली. अर्थात या पुढील भारत भेटीत गणपती पुळे येथील श्री दर्शन होताच मालगुंड गाठण्याचा मनाचा निर्धार मात्र आता पक्का झाला आहे.

आणि आता माडगूळ. त्या बाबत तर काय म्हणू ? मराठी साहित्याने ज्या गावामुळे 'मंतरलेले दिवस' अनुभवले, गीत रामायणातील लावण्य असो किंवा 'करुणाष्टकातील' कारुण्य असो, 'सत्तान्तारातील' वन्यजीवांचा संघर्ष असो. माडगूळच्या मातीतील माणसाने दाखवलेली माणुसकी सांगणारे 'माणदेशी माणसे' असो जे काही मराठी साहित्यात उतरले ते या माणदेशी माडगूळच्या मातीतूनच आले आहे. पुण्यात असून पंचवटीतील गजाननाचे चरण स्पर्श करण्याचे भाग्य चुकले पण तात्यांना नमस्कार करण्याचे पुण्य मात्र पदरी बांधता आले. आणि म्हणूच माडगूळच्या मातीने दिलेली दोन नक्षत्रे काळाच्या पडद्याआड गेली असली तरी मराठी मनात कायमच तळपत राहतील यात शंकाच नाही. हे नमूद करून मी माझे गावांच्या नावावरून केलेले हे भ्रमण थांबवतो. कशी वाटली हि शब्द भ्रमंती ते मात्र जरूर सांगा.

No comments:

Post a Comment